Coronavirus : ‘कोरोना’ पसरवण्याच्या संशय, ‘जमाती’चा मारहाणीत मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमात मर्कझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. तबलिगी जमातमुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप होत असताना बवाना येथे कोरोनाचा प्रसार करण्याचा कट रचल्याच्या संशयावरून एका 22 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. महबूब अली असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूब अली हा तबलिगी जमातीच्या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे गेला होता. 45 दिवसानंतर तो एका भाजीच्या ट्रकमध्ये बसून दिल्लीला परतला. त्याला आझादपूर भाजी मार्केटमधून पकडण्यात आले होते. मात्र, त्याची तपासणी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. परंतु तो आपल्या गावी गेल्यानंतर महबूबचा कोरोना विषाणू पसरवण्याचा कट असल्याची अफवा गावात पसरली.

गावातील संतप्त झालेल्या एका जमावाने रविवारी महबूबला एका शेतात नेऊन बेदम मारहाण केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मारहाणीच्या प्रकारानंतर महबूबला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.

You might also like