Mumbai : ‘कोरोना’च्या दुसर्‍या लाटेचा धोका, आदित्य ठाकरेंनी उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात सध्या कोरोना ( Corona) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु पुन्हा एकदा दुसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thakray) यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. यासंदर्भात आदित्य यांनी आज सर्व उपाययोजनांचा आढावा घेतानाच कोणत्याही आव्हानासाठी सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांनी याआधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

आदित्य यांनी आज उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी; तसेच पालिका व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला तसेच अनेक सूचना करण्यात आल्या. दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. गर्दी टाळली नाही तर काेरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपण आमंत्रणच देऊ, असे अनेक जाणकारांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळेच दिवाळी संपताच आदित्य यांनी ही आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला.

दिवाळीचा सण संपल्यानंतर आता मजुरांची परतण्याची संख्या वाढणार आहे. नव्याने विभागवार सर्वेक्षण करतानाच व्यापक तपासणी आणि जनजागृती यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असे आदित्य यांनी यावेळी नमूद केले. त्याचबरोबर संभाव्य रुग्णसंख्येच्या तुलनेत बेड्स उपलब्ध आहेत का, कोविड रुग्णालयांची सद्य:स्थिती काय आहे, या सर्वांचाच आदित्य यांनी यावेळी आढावा घेतला. दरम्यान, सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरे मुंबईतील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काेरोनाबाधित रुग्णालयात येण्याची वाट न पाहता त्या रुग्णापर्यंत पोहाेचण्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्यात आली. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाबाबत गंभीर असल्याचे दिसून येत आहे.