ST महामंडळातील कामगार कपातीला आम आदमी पार्टीचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   एसटी महामंडळाने चार हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. या निर्णयाला आम आदमी पार्टीचा विरोध असून एकही कर्मचारी कमी करू नये अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते कनिष्क जाधव यांनी केली आहे.

गेली सहा वर्षे शिवसेनेने एसटी महामंडळ अक्षरशः ओरबाडून खाल्ले. गेली सहा वर्षे परिवहन खाते आणि एसटी महामंडळ दोन्ही शिवसेनेकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे दिवाकर रावते परिवहन मंत्री होते. अतिखर्चिक निर्णय घेऊन दिवाकर रावते यांनी एसटीचा तोटा १,६८५ कोटीवरुन ५,१९२ कोटी इतका वाढवला. त्यांच्या अतिखर्चिक निर्णयाचे एक उदाहरण म्हणजे गणवेशाचा खर्च त्यांनी अकरा कोटीवरून शंभर कोटीवर नेला असे जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.

चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे ही सुरुवात आहे. सर्वच कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. अशावेळी आम आदमी पार्टी कामगारांच्या पाठिशी उभी आहे. महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पालकत्व राज्य सरकारने घ्यावे. एकही कर्मचारी कामावरून कमी करु नये अशी मागणी जाधव यांनी केली आहे.