आषाढी वारीच्या केवळ आठवणी, वैष्णवांना आस विठ्ठल दर्शनाची

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) –  यावर्षी आषाढी वारी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्यामुळे यावेळी लाखो वैष्णवांना या सोहळ्याचा आनंद उपभोता येणार नाही. हा पालखी सोहळा आजच्या दिवशी पुण्यनगरीचे आदरातिथ्य स्विकारुन पंढरीच्या वाटेने मार्गस्थ होतो आणि यामध्ये वैष्णवाचा हा महासागर पुणे सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर येथे मुक्कामी विसावतो परंतु हे विलोभनीय दृश्य केवळ आठवणी पुरतेच शिल्लक आहे.

वैष्णवाची मांदीयाळी संपूर्ण वर्षभर ज्या आषाढी पायी वरीची आतुरतेने वाट पाहतो हा पालखी सोहळा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी रद्द करावा लागला यावर्षी भक्तांना या पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मंदिरातून परंपरेने मार्गस्थ झाला असला तरीही या पालख्या आळंदी व देहू वरुन आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर सरळ पंढरपूरला पोहोचतील.आषाढी एकादशीच्या दिवशी कोणासही श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार नाही त्यामुळे हा सोहळा केवळ औपचारिकता बनला आहे.

आज जेष्ठ वद्य एकादशी या तिथीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामी तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी असतो.या सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण लोणीगाव भक्तीमय वातावरणात रमलेलं असत.जागोजागी स्वागतासाठी स्वयंसेवी संस्था तरुण मंडळे सामाजिक राजकीय नेते आपापल्या परीने भक्तांची सेवा करतात.

पालखी सोहळा रद्द झाल्याने गावोगावीच्या दिंड्यांनी आपापल्या गावातच दररोज नामसंकिर्तन चालू केले आहे. थेऊरमध्ये दररोज सकाळी काकड आरती आणि सायंकाळी हरिपाठाचे आयोजन केले आहे. कारण या पंधरा दिवसाचा कालावधी केवळ हरिनामातच जातो पंढरीच्या पांडूरंगाच्या भेटीची ओढ मनात लागलेली असते.