40 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, सरपंचावरही FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नळ पाणी पुरवठा टाकण्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी 40 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी सरपंचावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील कान्हुर मेसाई गावच्या ग्रामसेवक आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाराम सदाशिव शेलार (49, रा. कान्हुर मेसाई, ता. शिरूर) असे लाच स्विकारणार्‍या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्याला लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याबाबत सरपंच अनिल गोपाजी गोरडे (41, रा. कान्हुर मेसाई, ता. शिरूर) या सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने तात्काळ नळ पाणी पुरवठा टाकण्याचे ऑनलाइन टेंडर भरले होते. काम संपुर्ण केल्यानंतर कामाचे बील ग्रामपंचायतीकडे सादर केले होते. ते बील काढण्यासाठी तलाठी गंगाराम शेलार यांनी तक्रारदाराकडे 70 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

दरम्यान, तडजोडीअंती 40 हजार रूपये देण्याचे ठरले. सरकारी पंचासमक्ष शेलारने तक्रारदाराकडून 40 हजार रूपयाची लाच स्विकारली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com