5000 ची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील कडेगाव एमआयडीसीतील उद्योजक महिलेला कर्जासाठी कन्सेंट लेटर देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना सांगली एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती संतोष शेंडे यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

उपजिल्हाधीकारी स्वाती संतोष शेंडे (वय-43), सहायक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष मारुती माळी (वय-53), कंत्राटी लिपीक सुनिल भुपाल कुरणे (वय-30) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी उद्योजक महिलेच्या पतीने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ही कारवाई सांगली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात करण्यात आली. या कारवाईने महसूल आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे औद्योगिक विकास महामंडळ कडेगाव येथे 95 वर्षाच्या कराराने प्लॉट घेतला आहे. तक्रारदार यांनी या प्लॉटवरती व्यवसाय करण्यासाठी बांधकाम केले असून सदर व्यवसायासाठी रॉ मटेरिअल खरेदी करण्याकरता बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जाची रक्कम मिळण्याकरता तक्रारदार यांच्या पत्नीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सांगली यांच्याकडून कन्सेंट प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज केला होता. त्यानुसार सोमवारी (दि.9) तक्रारदार हे त्यांच्या पत्नी सोबत त्रैपाक्षीक करार करण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात आले असता लिपीक कुरणे याने तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी आज (बुधवार) लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. पंचासमक्ष पडताळी केली असता तिघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलीस कर्मचारी जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, राधिका माने, अश्विनी कुकडे, भास्कर भोरे, रविंद्र धुमाळ, देशपांडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/