मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताहून परतताना महिला पोलिसाचा अपघाती मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा अक्कलकोट यथे आयोजित करण्यात आली होती. येथून बंदोबस्ताची ड्युटी संपवुन परतत असताना महिला पोलीस शिपायावर काळाने घाला घातला. दुचाकीवरून सोलापूरकडे येत असताना एसटी बसच्या धडकेत या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. आरती दीपक साबळे (३१) असे या महिला पोलीस शिपायाचे नाव असून या घटनेमुळे त्यांची ३ वर्षाची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते बुधवारी दुपारी अक्कलकोट मध्ये आले होते. या प्रचारसभेत बंदोबस्ताची साबळे यांना ड्युटी होती. प्रचारसभेचे बंदोबस्त संपवून पोलीस शिपाई आरती साबळे व त्यांच्या सहकारी बानोबी शेख दुचाकीवरून सोलापूरकडे निघाल्या होत्या.

अक्कलकोट रस्त्यावरील कोन्हाळीजवळ एसटी बसने मागून दुचाकीला धडक दिली. या घटनेत साबळे व शेख या दोन्ही जखमी झाल्या. दोघींना तातडीने कुंभार येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वी साबळे यांचा मृत्यू झाला, तर शेख या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत. साबळे ५ जानेवारी २०१३ रोजी पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. साबळे यांना तीन वर्षाची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा आहे.

Loading...
You might also like