जे आपला पक्ष चालवू शकत नाहीत ते दुसऱ्यांना सल्ले देताहेत : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ठाणे येथील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मागील सहा सभांमध्ये राज ठाकरे यांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र मुंबईतील सभेत शिवसेनेचा उल्लेख करत शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन राज यांनी प्रथमच केलं. मोदींची सत्ता न येण्यासाठी भाजपाला मतदान करु नका आणि त्यामुळेच भाजपाच्य सोबत असलेल्या शिवसेनेला मतदान का करु नका, कारणं त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देण आहे. असं राज ठाकरे म्हणले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका, असे आवाहन करत फिरत आहेत. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे, ते तरी सांगा, असे विचारल्यावर या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही, त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आणि दुर्दशा झाली.’

राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला नाही. मात्र, राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे प्रचारसभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज्यभरात जाहीर सभांचा धडाका लावला आहे. राज यांच्या सभांचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा मुंबईत अभ्युदयनगर-काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर काळ झाली. दुसरी सभा बुधवार, २४ एप्रिल रोजी भांडुपला आहे. तिसरी सभा कामोठे येथे गुरुवार, २५ एप्रिल रोजी तर चौथी सभा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये होणार आहे.