अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास, 26 व्या वर्षी खासदार ते सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाची बाधा होती. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल सध्याच्या काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात. पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

अहमद पटेल यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४९ रोजी गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे झाला. त्यांचे वडील इशकजी पटेल हे काँग्रेस नेते आणि भरुच तालुका पंचायतीचे सदस्य होते. त्यांचे बोट धरूनच अहमद पटेल यांनी राजकारणात पदार्पण केलं. परंतु, पटेल यांनी स्वतःच्या मुलांना शेवटपर्यंत राजकारणापासून लांबच ठेवलं. पटेल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पंचायत तालुका अध्यक्ष म्हणून केली. तदनंतर, तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभेवर सदस्य म्हणून काम केले.

१९७७ साली अहमद पटेल यांनी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यावेळी देशात इंदिरा गांधीविरुद्ध वातावरण असताना पटेल यांनी भरुच लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत २६ व्या वर्षी लोकसभेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढ्यासोबत काम केले. इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण पटेल यांनी मंत्रिपद नाकारून संघटनेत काम करण्यास प्राधान्य दिले. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनीही मंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यावेळीही त्यांनी त्यास नकार दिला.

अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम करत असतानाच युवा काँग्रेसचे नेटवर्क तयार केले. १९८६ मध्ये ते गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९९१ मध्ये नरसिंहा राव यांच्या कार्यकाळात त्यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य बनवण्यात आले. तिथे ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. १९९६ साली पटेल काँग्रेसचे कोशाध्यक्ष बनले. २००० मध्ये सोनिया गांधी यांच्या खासगी सचिवांसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे पद सोडले. मात्र, काही दिवसांनी ते सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार बनले.

त्यानंतर दिल्ली कारभारातील राजकारणात पटेल यांनी स्वतःला प्रस्थापित केले. गांधी कुटुंबीयांसोबत काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पहिले जात. असे म्हटले जाते की, पटेल यांच्या सल्ल्यांमुळेच सोनिया गांधी राजकारणात स्वतःला प्रस्थापित करू शकल्या. अहमद पटेल यांना १० जनपथचे चाणक्य असे संबोधले जात. २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस पक्ष सत्तेत असताना अहमद पटेल यांची राजकीय ताकद सर्वांनी अनुभवली होती. त्याचसोबत राज्यांपासून केंद्रांपर्यंत स्थापन होणाऱ्या सरकारांमध्ये काँग्रेस नेत्यांचे भवितव्य पटेलच निश्चित करत. अर्थात काँग्रेसचा रिमोट कंट्रोलच अहमद पटेल यांच्याकडे होता.