अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात फुटताहेत दिवाळीपुर्वीच फटाके, जाणून घ्या कारण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात रोज रात्री फटाक्यांचे धमाके सुरू असल्याचं दिसत आहे. दिवाळीआधीच ऐकू येणारे फटाक्यांचे हे बार आनंदानं नव्हे तर स्वत:च्या बचावासाठी केले जात आहेत. ग्रामस्थांकडून रोज हे फटाक्यांचे बार केले जात आहेत. या भागातील बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळं त्याला पळवून लावण्यासाठी वन विभागानं ही युक्ती शोधली आहे. त्यासाठी वाड्या वस्त्यांवर फटक्यांचं वाटपही करण्यात आलं आहे.

पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नगरचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी स्वत: या भागात तळ ठोकून मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. परंतु बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही.

अद्याप या बिबट्यानं 3 बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केलं आहे. पाथर्डी शहराजवळ एका कुत्र्यावरही त्यानं हल्ला केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं बिबट्या याच भागात असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. या भागात गर्भागिरीची डोंगर रांग आहे. त्यात वाढलेलं जंगल, शेजारीच शेतातील पिके आणि त्यातच वसलेल्या वाड्या-वस्त्या असा हा भाग आहे.

डोंगर-दऱ्या आणि शेतं पिंजू काढल्यानंतरही बिबट्या सापडत नाही हे पाहून आता त्याच्यापासून बचावाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी वन विभागानं या भागातील वाड्या वस्त्यांवर 200 बॉक्स फटाके वाटले आहेत. रोज सायंकाळी आणि रात्री ग्रामस्थ वस्तीजवळ, गावाजवळ फाटके फोडत आहेत. त्याच्या आवाजानं जवळपास असलेला बिबट्या पळून जाईल अशी काहीशी युक्ती आहे.

दुसरीकडे त्याला पकडण्यासाठी वन विभागाची मोहिमही सुरू आहे. राज्यातून आलेली पथकेही त्याचा कसून शोध घेताना दिसत आहेत. एकूण 22 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहत. त्याचा माग काढण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरेही लावले आहेत. अद्याप कोणत्याही प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. परंतु ही मोहिम सुरू झाल्यापासून मात्र या बिबट्यानं माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली नाही ही काहीशी दिलासदायक बाब आहे.