’अगोदर स्वत:च्या नेत्यांना आवरा आणि नंतर राम मंदिराबाबत भाजपला सल्ले द्या’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राम मंदिराचे भूमिपूजन हाती घेतले आहे. तो आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सल्ला देण्यापेक्षा गर्दी जमवत दररोज वेगवेगळी भूमीपूजन, उदघाटने करणार्‍या आपल्या पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांवर नियंत्रण आणावे, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.

जिल्हा परिषदमध्ये आज विखे हे एका बैठकीच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

’महाविकास आघाडीचे कितीतरी मंत्री सध्या त्यांच्या मतदारसंघात रस्त्याचे भूमिपूजन करत आहेत. बंधार्‍याचे जलपूजन घेऊ लागले आहेत, उद्घाटने करू लागलेेत. आपल्या नगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज भूमिपूजन आणि उद्घाटन करून गर्दी गोळा करीत आहेत. करोना विषाणू असल्यामुळे त्यांनी स्वतः हे थांबवले पाहिजे. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र, स्वतःच्या पक्षाचे आमदार, मंत्र्यांकडून होणारे भूमिपूजन, उद्घाटन रोखले जात नाहीत. आधी तुम्ही ही भूमिपूजने, उदघाटने थांबवा आणि मग, भाजपला सल्ला द्या,’ असेही विखे म्हणाले.

’भाजपने जे भूमिपूजन हाती घेतले आहे, तो भारत देशाच्या आस्थेचा प्रश्न असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही मागील कित्येक वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहत होतो. ज्यामध्ये एक पिढी गेली, त्या रामजन्मभूमीचे निर्माण आता सुरू होत आहे. त्यामुळे त्यावर टीकाटिप्पणी करण्याची आवश्यकता नाही,’ असेही विखे म्हणाले.

एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राम मंदिर भूमिपूजन प्रतिकात्मक करण्याबाबत वक्तव्य केले होते. याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, ’ एमआयएमकडून राम मंदिराबाबत वेगळ्या वक्तव्याची अपेक्षा नाही. ते तर म्हणू शकत नाहीत की मी भूमिपूजनला येतो. तसेच राम मंदिराचे भूमिपूजन हा इतर सण-उत्सवांसारखा दरवर्षी येणारा उत्सव नाही. त्यामुळे राम मंदिराला धर्माशी जोडण्याचे कारण नाही.