अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याकडे आहे ‘इतकी’ संपत्ती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार असणारे डॉ. सुजय विखे पाटील यांची संपत्ती तब्बल ११ कोटी १७ लाख आहे. तर त्यांच्या पत्नी धनश्री यांच्याकडे ५ कोटी ७ लाखांची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी याची माहिती दिली आहे.

तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच यांच्याकडे ४ कोटी ९१ लाखांची जंगम आणि ६ कोटी २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर १ लाख १६ हजार २९५ रुपयांची रोकड आहे. त्याचबरोबर पत्नीकडे १ लाख ३७ हजार ४८५ रुपये रोकड असून त्यांच्यावर प्रवरा बँकेचे २६ लाख २३ हजारांचे कर्ज आहे. तसेच विखे यांचे नाव शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवले गेले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

अहमदनगर लोकसभेसाठी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप मैदानात आहेत. विखे पाटील-पवार वादामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे अहमदनगरची लोकसभा निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.