राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि पार्थ नाराज ? प्रदेशाध्यक्षांनी केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. या टीकेनंतर नाराज पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची भेट घेतली. यानंतर पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजोबा विरोधात नातू मोठा निर्णय घेणार का ? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार किंवा पार्थ पवार हे नाराज नाहीत त्यामुळे त्यांना मनवण्याचा प्रश्नच नाही. पार्थ कोणताही निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्न नाही. घरवापसीच्या मुद्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. याबाबत बोलणी सुरु आहेत असेही त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. सीबीआयबाबत ते बोलले आहेत तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे पवार यांनी सांगितले.