अजित पवार मुख्यमंत्र्याप्रमाणे वागतायत : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात मोर्चा काढला होता. मोर्चानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.

कोरेगाव भीमा विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे ? आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची ती लवकरात लवकर करा. सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे त्यामुळे तेच पडतील असा टोला त्यांनी लगावला. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वत:च वेगवेगळ्या घोषणा करत असल्याची टीका त्यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केले नाही तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.

महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात भाजपने आज कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सरमजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्सच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.

You might also like