फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर अजितदादा शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र यांचा शपथविधी सोहळा पहाटेच्या सुमारास पार पडला होता. त्यानंतर स्थापन झालेलं सरकार काही तासांचं ठरलं होत. या संपूर्ण घटनाक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना राष्ट्रवादीकडूनच सत्ता स्थापनेची ऑफर होती, असा खुलासा केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, अजित पवार हे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहचले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक बंगल्यावरती दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. एका मुलाखतीदरम्यान, फडणवीस यांनी अनेक खुलासे केले आहेत. शिवसेनेचा नकार आल्यानंतर राष्ट्रवादीकडूनच सत्तेसाठी सिग्नल मिळाले होते, असा खुलासा फडणवीसांनी केला होता.

फडणवीस यांनी बोलताना म्हटलं होत की, ‘२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सरकार बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठक झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी होतो, एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता’ असा खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. तसेच फडणवीसांनी नाव घेता सरळ शरद पवारांच्या सांगण्यावरुनच अजित पवार भाजपाला मिळाले असं थेटपणे सूचित केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागला असता तर अजित पवारांचे सरकार १०० टक्के टिकलं असते, असं देखील फडणवीस यांनी देखील नमूद केलं.

“भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोन वर्षापूर्वीच बनले असते. पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत” असं सुद्धा त्यांनी सांगितलं. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंचा एकही शब्द डावललेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा सात्विक संताप आल्याचं देखील त्यांनी मुलाखतीवेळी बोलताना म्हटलं.