‘कोरोना’ नियमांचे पालन करून दिवाळी साजरी करा; अजित पवारांचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करून साजरी करूया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करून त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करून घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया, असं आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. दिवाळीनिमित्त घराघरात लागलेल्या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरांचा अंधारही आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करूया. आपलं राज्य सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. ही लढाई लवकर जिंकायची असेल तर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं पाहिजे. मास्क लावणं, गर्दी टाळणं, वारंवार हात धुत राहाणं, यांसारखी दक्षता घेऊन प्रत्येकानं स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यात योगदान द्यावं, असेही ते म्हणाले. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या आहेत.