वारकऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटात भीषण अपघात

पोलादपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलादपूर-आंबेनळी घाटामध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात होऊन 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी अपघात झाले. असाच एक भीषण अपघात वारकऱ्यांच्या मिनी बसला झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये असलेल्या आड कुंभळवणे गावाजवळच्या तीव्रवळण उतारावर हा अपघात झाला.

शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक मिनी बस आंब्याच्या झाडावर धडकली आणि पंढरपूर येथून परतणारे 19 वारकरी जखमी झाले. हे सर्व वारकरी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दिवाण खवटी गावातील असून ते कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूला गेले होते. पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन शनिवारी पहाटे ते परत निघाले. यावेळी पोलादपूरनजिक आंबेनळी घाटातून बस जात असताना आड कुंभेळवणे गावाजवळील तीव्र वळणावर आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली. यामध्ये 19 वारकरी जखमी झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक नितेश सावंत याच्यासह चार जणांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वारकऱ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास करत आहेत.

Visit : Policenama.com