‘वायफळ बडबड सतत ऐकतीय, एकनाथ खडसेंचं ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपमधून (BJP) बाहेर पडताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्यावर दाखल झालेल्या विनयभंग गुन्ह्याचा उल्लेख केला. एकनाथ खडसेंना यावेळी अंजली दमानिया (anjali damania) यांचाही उल्लेख केला. अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर माझ्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असा आरोप खडसे यांनी केला आहे. खडसेंच्या आरोपांना आता अंजली दमानिया उत्तर देणार आहेत.

खडसे यांचे ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, एकनाथ खडसेंच्या कालच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते. पण रात्री मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी याच विषयावर आज मी मुंबई मराठी पत्रकार संघात संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्याआधी ट्विट करत त्यांनी आपण सतत एकनाथ खडसेंची वायफळ बडबड ऐकत असल्याचं म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण ?

7 सप्टेंबर 2017 रोजी अंजली दमानियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील (IPC)कलम 509 (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा वापर करणे) अंतर्गत खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला होता. या भाषणात खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह व असभ्य भाषा वापरली, असे दमानियांनी म्हटले होते. खडसे यांच्या वाढदिसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खडसेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.