भाजपला धक्का ! नगरसेवकानं शिवसेनेसोबत हातमिळवणी करत मिळवलं सभापती पद

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन –   बहुमत असूनही उल्हासनगर महापालिकेत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे भाजपच्या नगरसेवकानं पक्षालाच धोका देत शिवसेनेच्या मदतीनं स्थायी समितीचं सभापतीपद मिळवलं आहे. त्यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी उल्हासनगर महापालिकेत ऑनलाईन महासभेत ही निवडणूक पार पडली. भाजप नगरसेवक असलेल्या आणि पक्षासोबत बंडखोरी केलेल्या विजय पाटील यांना 8 तर भाजपच्या अधिकृत उमेदवार जया माखीजा यांना 7 मतं मिळाल्यानं भाजपचे बंडखोर पाटील यांचा विजय झाला.

भाजपला बहुमत असूनही शिवसेनेनं जी काही राजकीय खेळी केली त्यामुळं भाजपच्या हातून वर्षभराच्या काळात महापौर पदानंतर स्थायी समिती पदही गमावण्याची नामुष्की आली आहे. तर चारही प्रभाग समित्यांवर महिला राज असल्याचं दिसत आहे. भाजपच्या वाट्याला 3 तर काँग्रेसच्या वाट्याला 1 प्रभाग सिमिती आली आहे. एकूण 16 सदस्य असलेल्या या समितीत भाजपचे 9 तर शिवसेना आणि काँग्रेस, रिपाई मित्र पक्षाचे मिळून 7 सदस्य होते.

हेच कारण आहे की, भाजपला या निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास होता. परंतु सभापती पदासाठी भाजपकडून 2 सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचवेळी भाजपचे नगरसेवक विजय पाटील यांनी पक्षाशी बंडखोरी करत शिवसेनेच्या पाठींब्यानं स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळं भाजपला मोठा धक्का बसला.

निवडणुकीच्या 2 दिवस आधी स्थायी सदस्य डॉ प्रकाश नाथांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळं शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि स्थानकि शिवसेना नेत्यांच्या राजकीय खेळीमुळं अवघ्या 2 दिवसात बहुमतात असलेली भाजप अल्पमतात गेली. गुरुवारी दुपारी पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन महासभा आणि निवडणूक पार पडली.