‘नालेसफाई की हातसफाई’ ! मुंबईतील नालेसफाईवर आशिष शेलारांचा सवाल

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत पावसाळ्याला सुरूवात होण्याआधी नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. यंदाही नालेसफाईचे काम झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे. मात्र, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून महापालिकेला धारेवर धरले आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे असे शेलार यांनी म्हणत अनेक प्रश्न केले आहेत.

पाऊस दाखल झालेला नसला तरी नालेसफाईचे काम महापालिकेकडून केल्याचा दावा आहे. महापालिका आयुक्तांनी नालेसफाई बाबत केलेल्या दाव्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले असून, त्यात नालेसफाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा ‘डोंगर’ उभा केला जातो. आयुक्त मोठमोठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात सगळे दावे वाहून जातात. नव्या आयुक्तांनी यावर्षी 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ वर्षानुवर्षे सुरू आहे.

मुंबईकर म्हणतात 40 टक्के पेक्षा जास्त सफाई झालेली दिसली नाही. त्यामुळे 113 टक्केचा दावा 227 टक्के खोटा आहे. जर नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला? वजन काट्याची आकडेवारी जाहीर का करीत नाही? सीसीटीव्ही फुटेज का जाहीर करीत नाही? ही नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, असे म्हणत शेलार यांनी महापालिकेला प्रश्न विचारले आहेत.