१५०० हजार रुपयाची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – दारु धंदा सुरु करण्यासाठी लाचस्वरुपात हप्ता घेणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाला हिंगोली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सेनगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

रहीम शेख असे पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

रहीम शेख हा सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार यांना अवैध दारु विक्रीचा धंदा चालू करायचा होता. दारु धंदा सुरु करण्यासाठी रहीम शेख याने स्वत:साठी १००० हजार रुपये तर त्याचा मदतनीस पोलीस शिपाई पठाण याच्यासाठी ५०० रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने बुधवारी (दि.२८) तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली. यावेळी रहीम शेख याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून शेख याला लाचेची रक्कम स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोलीचे पोलीस उप अधीक्षक रवींद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितिन देशमुख, जितेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी पोलीस नाईक दुमाणे, कबाडे, थोरात, कीर्तनकार, चालक धांडेकर यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.