बिल्डरच्या लोकांकडून कसबा पेठेतील ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न, 15 जणां विरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील जमीनीचे भाव गगनाला भिडले असून अनेक मोक्याच्या जागा मिळवण्यासाठी बिल्डर कडून कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुण्यातील कसबा पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला गेला.याप्रकरणी बिल्डरच्या सुपरवायझरसह 15 जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप शेळके याच्यासह 15 जणांविरुद्ध दंगल माजविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रविण विनायक डेरे (वय 64, रा़ कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कसबा पेठेत रविवारी (दि.17) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण डेरे यांच्या आजोबांचा कसबा पेठेत वाडा आहे. या वाड्याचे 8 हिस्से करण्यात आले होते. त्यांनी हा वाडा विकसित करण्यासाठी पिंपरीतील बंधकाम व्यवसायिकाला 2010 मध्ये दिला. मात्र, बांधकाम व्यवसायिकाने करारानुसार काम न करता चार भिंती आणि त्यावर स्लॅब टाकला. एवढेच बांधकाम या बांधकाम व्यावसायिकाने केले.

अखेर डेरे यांनी उर्वरित काम करुन ते त्या घरात रहायला गेले. रविवारी सकाळी ते घरात असताना बांधकाम व्यवसायिकाचा सुपरवायझर संदीप शेळके हा १५ ते १६ महिला पुरुषांना घेऊन आला. त्यांनी घरात शिरून घरातील कपाट आणि इतर सामान घराबाहेर फेकून दिले. तसेच आम्ही बिल्डरची माणसे असल्याचे सांगून संपूर्ण घाराची तोडफोड करत दोन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच शेळके याने स्वत: बरोबर लोखंडी दरवाजा आणला होता. तो घराच्या दरवाजाबाहेरील बाजूला बसवून घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. घरातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com