देवेंद्र फडणवीसांना ‘अहंकार’ नडला, ‘या’ ज्येष्ठ अर्थतज्ञांनी सांगितलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या भाजपपासून दूर जाऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपने ज्या प्रकारे प्रचार केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी आधी मोठ्या प्रमाणात आयारामांना पक्षात स्थान दिले, प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी जो अहंकार दाखवला तोच त्यांना आता नडला असल्याचे वक्तव्य जेष्ठ अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले आहे.

स्थापन होणाऱ्या सत्तेच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्यामुळे कृषी विभागाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे देखील देसरडा यांनी सांगितले. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर पावसामुळे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या परिस्थितीला गांभीर्याने घ्यावे अशी सूचना प्रा. देसरडा यांनी राज्यपालांना केली आहे.

राज्यपालांची घेणार भेट –

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले असताना, शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. परंतु राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना नेमकं कोणाकडे मदत मागायची याबाबत संभ्रम स्थिती आहे. म्हणूनच याविषयी भेटीसाठी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाने राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितल्याची माहितीही प्रा. देसरडा यांनी दिली.

शेतीबाबत चिंताजनक परिस्थिती –

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, शेतकऱ्याला मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. यासाठी राज्यपालांना एक पत्र लिहून याबाबतची माहिती गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले असल्याचे प्रा. देसरडा यांनी सांगितले. एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. 13 कोटींपैकी 11 कोटी लोकांच्या हालअपेष्टा होत आहेत. मावळत्या सरकारने पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी मदत देण्याचे घोषित केले. पण पुढे काय, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी लवकर समित्या नेमून नुकसानग्रस्तांना मदत करावी असे देखील देसरडा यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com