पवार कुटुंबाने सातत्याने अन्याय केला त्याची व्याजासह परतफेड करा : विजय शिवतारे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – संधी वारंवार येत नसते. ज्या पुरंदरवर पवार कुटुंबाने सातत्याने अन्याय केला त्याची सव्याज परतफेड करण्याची नामी संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.  सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही बाब जनतेच्या लक्षात आणून द्यावी आणि कांचन कुल यांना जास्तीत जास्त मतदान  होण्यासाठी कामाला लागावे असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. दिवे येथे शिवसेना, भाजप, रासप आणि आरपीआय महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.  बैठकीला दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर, पुरंदरच्या सभापती अर्चना जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीवर भयानक केवीलवाणी वेळ आली आहे. १२ वर्षात एक काम त्यांना केंद्राच्या माध्यमातून करता आले नाही. शिवसेना भाजपच्या माध्यमातून होत असलेल्या कामांवरच रेघोट्या मारल्या जात आहेत. आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांच्यासारखे खासदार जनतेला सहज उपलब्ध असतात. आपल्या खासदारांचे साधे कार्यालयही जनतेला ठावूक नाही. केवळ शरद पवारांची मुलगी म्हणून त्यांना मतदान करण्यात जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. पुरंदरसह, हवेली, दौंड, खडकवासला, इंदापूर, बारामती, भोर, वेल्हा, मुळशी अशा कुठल्याही तालुक्यात सुळे यांनी आपले काम दाखवावे असेही शिवतारे म्हणाले.

आमदार योगेश टिळेकर म्हणाले, पुरंदर तालुक्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाच दशकं दुर्लक्ष केले. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून गुंजवणी, राष्ट्रीय महामार्ग, १२५ किलोमीटर ग्रामीण रस्ते, फुरसुंगी उरुळी देवाची पाणीयोजना, सिमेंट बंधारे, शेततळी व इतर अनेक विक्रमी कामे झाली. त्यामुळे पुरंदर हवेली मतदारसंघाकडून लोकसभेला मोठ्या अपेक्षा आहेत. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक एक खासदार महत्वाचा आहे. त्यामुळे कांचन ताईंना पुरंदर हवेली मधून मोठे मताधिक्य द्या असे श्री. टिळेकर म्हणाले.

‘घंटा’ वाल्यांनाही भाव आला  – आमदार राहुल कुल
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले कांचन कुल यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘घंटा’ कळत नाही या अजित पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत कुल म्हणाले, त्याच घंटावाल्यांचा भाव आता वाढला असून निवडणुकीसाठी का होईना राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांचे त्यांना फोन जात आहेत. ही महायुतीची जादू असून आता परिवर्तन अटळ आहे. आपणच उमेदवार आहोत या भावनेने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन यावेळी कुल यांनी केले.