मुसळधार पावसामुळं भाटघर धरण 94.70 टक्के भरलं !

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा खो-यातील भाटघर , नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे यंदा गत वर्षापेक्षा या वर्षी धरणे भरण्यास उशीर झाला आहे. मात्र सोमवारी (दि.१७) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भाटघर धरण ९४.७० टक्के भरले असून मागील दोन – तीन दिवसांंपासून पावसाचा जोर जसा होता तसा जोर येत्या काही दिवसांत राहिला तर भाटघर धरण लवकरच १०० टक्के भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाच्या सुत्रांकडून व्यक्त करण्यात आला.

मागील दोन – तीन दिवसांत नीरा खो-यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने सोमवारी (दि.१७) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नीरा देवघर धरण ८७.१४ टक्के भरले आहे. तर भाटघर धरण ९४.७० टक्के भरून १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. तर वीर धरण ९३.२० टक्के व गुंजवणी धरण ९५.२१ टक्के भरले आहे.

दरम्यान, गत वर्षी या दिवशी नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणांत ४८.१५२ टि.एम.सी पाणी साठा उपलब्ध होऊन चारही धरणे ९९.६३ टक्के भरलेली होती. मात्र यंदा या चारही धरणांत ४४.७६३ टि.एम.सी. पाणी साठा असून ही धरणे ९२.६१ टक्के झाली आहेत.

नीरा खो-यातील नीरा देवघर धरण साखळीत सोमवारी (दि.१७) सकाळी सहा वाजले पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २८ मि.मी.पाऊस झाल्याची नोंद झाली असून भाटघर व वीर धरण साखळीत शुन्य मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच गुंजवणी धरण साखळीत २३ मि.मी.पावसाची नोंद झाली. त्यामुळे नीरा खो-यातील चारही धरणांत ५१ मि.मी. पाऊस झाल्याने वीर धरणात येणा-या पावसाच्या पाण्याची आवक कमी होऊ लागली.

त्यामुळे वीर धरणातून टप्या- टप्याने पाण्याचा विसर्ग कमी करून रविवारी (दि.१६) संध्याकाळी
धरणाच्या तीन दरवाजातून पाच वाजलेपासून सोमवारी (दि.१७) संध्याकाळी उशिरा पर्यंत १३ हजार ३४४ क्यूसेक्स वीर धरणातून व वीज निर्मिती केंद्रातून ८००क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू होता. त्यामुळे नीरा नदी काठच्या रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, वीर धरणातून नीरा उजव्या कालव्यातून ५०८ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.