Twitter यूजर्ससाठी मोठी बातमी ! बंद केली मेसेजद्वारे ट्विट करण्याची ‘सेवा’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरने एसएमएसद्वारे ट्विट करण्याची सुविधा बंद केली आहे. ही सुविधा बंद करण्यामागील ट्विटरचा उद्देश सुरक्षा वाढविणे हा आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार ट्विटरने एसएमएसद्वारे ट्विट सुविधा बंद करण्यास सुरुवात केली आहे. बर्‍याच देशांमध्येही ते बंद केले गेले आहे. अशा परिस्थितीत, आपण यापुढे एसएमएसद्वारे ट्विट करु शकणार नाही. ट्विटरने जेव्हा 140 कॅरेक्टरमध्ये ट्विट करण्याची सुविधा दिली होती, त्याच वेळी ट्विटची सुविधा एसएमएसद्वारे देखील देण्यात आली होती. कंपनीने असे म्हटले आहे की, बहुतेक युजर्स हे वैशिष्ट्य वापरत नाहीत आणि यामुळे अनेक मार्गांनी तक्रारीही येत आहेत.

सन 2018 मध्ये ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचे अकाऊंट मेसेजद्वारे ट्विट करण्याच्या सुविधेद्वारे हॅक करण्यात आले होते. त्यांच्या अकाऊंटवरून अपमानकारक आणि जातीयवादी ट्विट केले गेले होते आणि अशाप्रकारचे ट्वीट रीट्वीट देखील करण्यात आले होते. या हॅकिंगनंतर सोशल मीडिया युजर्सने कमकुवत पासवर्डसाठी डोर्सी यांची चेष्टा देखील केली होती.

इंग्रजी व्यवसाय वेबसाइट लाइव्हमिंटच्या मते, अनेक देशांमध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती, एसएमएसद्वारे ट्विट करण्याची सुविधा बंद करण्यामागील सुरक्षा वाढविणे हा ट्विटरचा उद्देश आहे. ट्विटरची अशी इच्छा आहे की, युजर्सने फक्त दोन माध्यमातून म्हणजे डेस्कटॉप आणि मोबाइल अॅप्सवरून ट्विट करावे, जेणेकरून त्यांच्या अकाऊंटची सुरक्षा आणि प्रायव्हसी कायम राहील.