‘लॉकडाऊन’मुळे देशात मीठाचा पुरवठा कमी होणार ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात अर्थव्यवस्था कोलमडली असून विविध वस्तूंचे उत्पादनही घटले आहे. जर लॉकडाऊन अशाच पद्धतीने वाढत राहिला तर येणार्‍या काळात मीठाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. देशाच्या किनारपट्टी भागात मीठाचे उत्पादन घेणारे मजूर घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजूरांसाठी सरकारने खास श्रमिक ट्रेन्स चालवल्या जात आहेत. जेणेकरून हे मजूर आपापल्या घरी पोहोचतील. मजूरांच्या कमतरतेमुळे मीठाचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. लवकरच याचा परिणाम मीठाच्या पुरवठ्यावर दिसण्याची शक्यता आहे.

देशातील विविध समुदृ किनारी मीठ बनवण्याची प्रक्रिया ऑक्टोबर ते जून या कालावधी दरम्यान केली जाते. तर सर्वात जास्त उत्पादन मार्च आणि एप्रिल महिन्यात होते. देशात तयार होणार्‍या मीठापैकी 95 टक्के मीठाचे उत्पादन गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये होते. उर्वरित उत्पादन महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये होते. दरवर्षी भारतामध्ये 200 ते 250 लाख किलो मीठाचे उत्पादन केले जाते.

कोरोनामुळे मीठाच्या उत्पादनामध्ये उन्हाळ्यातील एका महिन्यात झालेले नुकसान इतर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या 4 महिन्याच्या नुकसानाएवढे आहे. नुकसानाची भरपाई होईल की नाही हे देखील ठावूक नसून आता आमच्याकडे केवळ 45 दिवस असून मीठ उत्पादनाचे सायकल 60 ते 80 दिवसांचे असते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पुढील काही दिवसात आमचे उत्पादन नाही वाढले तर प्रसंग कठीण होईल. कारण आमचा ऑफ सीजन (पावसाळा) बफर स्टॉक एवढा जास्त नाही आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन संपल्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा मीठाची मागणी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.