आकाशातून संकट कोसळलं, वीज पडल्यानं बिहार आणि उत्तरप्रदेशात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

पटना : वृत्तसंस्था –  बिहारमध्ये गुरुवारी (२५ जून) वीज कोसळल्याने व वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बिहारमध्ये वीज कोसळल्याने 83 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. उत्तर प्रदेशातही वीज कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत्यूमुखी पडलेल्या 83 जणांचा कुटूंबियांना प्रत्येकी 4 लाख रूपये मदत जाहीर केली आहे.

बिहारमधील 23 जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने मानवहानी झाली आहे. सर्वाधिक मृत्यू गोपालगंजमध्ये झाले असून तिथे 13 लोकांचा मृत्यू झाला. तर मधुबनी आणि नबादा येथे 8-8 लोक ठार झाले.

बिहारमध्ये असे 8 जिल्हे आहेत, जिथे किमान 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात गोपालगंज, पूर्व चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर याशिवाय मधुबनी आणि नबादा हे जिल्हे आहेत.

death-toll_062520064506.jpg

मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान हवामान खात्याने बिहारसाठी ७२ तासांचा अलर्ट जारी केला आहे. येत्या ७२ तासांत बिहारमध्ये मुसळधार पावसाबाबत हवामान खात्याने आज गुरुवारी सतर्कतेचा इशारा दिला.

हवामान खात्याकडून दिलेल्या या अलर्टमध्ये संपूर्ण राज्यात जोरदार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये बुधवारी मान्सून दाखल झाला, ज्यामुळे तेथील तापमानात घट नोंदवली गेली. आज गुरुवारी दिल्ली-एनसीआरच्या काही भागात वादळासह पाऊस पडला.

युपीमध्येही अनेक जणांचा मृत्यू

फक्त बिहारच नाही तर उत्तर प्रदेशातही वीज कोसळल्याने किमान 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. देवरियामध्ये वीज कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आणि निम्मे लोक जखमी झाले. बाराबंकी येथे वीज कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले.