भाजपाचं आज राज्य सरकारविरोधात आंदोलन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यात कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपने शुक्रवारी ‘ माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. कोरोना मुकाबल्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातमोजे, पीपीई किट घालून ‘ मातोश्री ‘ निवास स्थानाबाहेर पडावे, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लगावला आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी भाजपची मागणी आहे.

मुंबईत परिस्थिती गंभीर असून रूग्णांचे हाल होत आहेत. त्यासाठी उपचारांची योग्य व पुरेशी व्यवस्था करावी. जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलनातील हा दुसरा टप्पा असल्याचे पाटील यांनी सांगितले. कोरोना चाचण्यांमध्ये लागण झालेल्या रूग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे. तसेच मुंबईत ते त्याहून अधिक आहे. एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या वजा केली तर मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांचे प्रमाण जवळजवळ 22 टक्के आहे.

कोरोना रूग्णांवर मोफत उपचारांची घोषणा करण्यात आली असताना अनेक खासगी रूग्णालयांकडून लाखो रूपयांची बिल आकारणी करण्यात येत आहे. त्यांना महापालिकेकडून हजारो रूपये दरही निश्चित करून देण्यात येत आहेत. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची होत असलेली लुबाडणूक थांबवावी, अशी मागणीही फडणवीस यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

You might also like