‘…तुमच्यात हिंमत नाही !’, चंद्रकांत पाटलांचं शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादीला जाहीर ‘आव्हान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आमची सगळ्या गोष्टींची तयारी आहे. 5 वर्षांचं सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं वेगवेगळं लढावं असं जाहीर आव्हान देखील त्यांनी दिलं आहे. परंतु तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्व वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपवर टीका करणं हे संजय राऊत (Sanjay Raut) याचं कर्तव्य आहे. त्यांनी ते बजावलं पाहिजे. त्यामुळं त्यांची पक्षात आहे ती जागा आहे. त्यामुळं संजय राऊतांनी टीका केल्यावर आश्चर्य वाटत नाही. आमच्यावर अनेकदा अग्रलेखही असतात. त्यामुळं त्यात काही विशेष नाही” असं म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तरही दिलं.

पुढं बोलताना ते म्हणाले, शरद पवारांचा (Sharad Pawar) सल्ला घेतात ही आनंदाची गोष्ट आहे. शरद पवार महाराष्ट्र चालवतात, उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नाही हे त्यांनी मान्यच केलं आहे. आता ते पवारांचा सल्ला घेऊ देत किंवा पार्थ पवारांचा (Parth Pawar) घेऊ देत” असा टोलाही पाटलांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी चंद्रकांत पाटली यांनी त्यांच्या कामगिरीला शून्य मार्क दिले. पाटील म्हणाले, “सरकार चालवताना कोरोनाचा जो मोठा कालावधी गेला त्यात काय झालं हे सर्वसामान्यांना विचारा. मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना, पश्चिम महाराष्ट्रात कर्ज वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं का विचारा” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.