जळगावात भाजपने बदलला उमेदवार ; स्मिता वाघ यांचा पत्ता कट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्व पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. जळगावात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा रंगली असताना भाजपाकडून उन्मेष पाटील यांना बुधावारी रात्री बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. जळगाव मतदार संघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी भाजपाने उन्मेष पाटील यांना बी फॉर्म दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. पण स्मिता वाघ यांच्या नावाबाबत भाजपकडून पुनर्विचार केला जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर नाट्यमयरित्या भाजपने जळगाव मतदार संघात उमेदवार बदलला आहे. चाळीस गावचे विद्यमान आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांना भाजपकडून बी फॉर्म देण्यात आला आहे.

दरम्यान, तिकडे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात देखील भाजपकडून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट करुन मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना शिवसेनेशी पंगा चांगलाच भोवला आहे. मनोज कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे संकेत पक्षाने दिले होते. त्यानुसार आता मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी कोटक यांना उमेदवारी देण्यात आली.