भाजप नगरसेवकाने ‘स’ यादीतील 2.20 कोटी निधी राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकाला दिला

'उद्देश' काय ? खमंग चर्चा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेचा प्रभाग क्र. १ धानोरीमधील विकासाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच येथील भाजपच्या एका नगरसेवकाने त्या निधीचा दोन कोटी 20 लाख रुपयांचा निधी प्रभाग क्र. ३७ आणि ३८ मधील अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या प्रभागातील विविध विकासाची कामे करण्यासाठी वर्ग केला आहे. एकीकडे सर्वच नगरसेवक अधिकाअधिक कामे करण्यासाठी निधी मिळावा यासाठी स्थायी समिती, गटनेते आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना भाजपच्या नगरसेवकाने त्याचा निधी दुसऱ्याला देण्यामागचा उद्देश काय ? याची ‘खमंग’ चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे प्रभाग क्र. १ धानोरी – कळस मधील मारुती सांगडे हे २०१७ मध्ये पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या प्रभागात चारही नगरसेवक भाजपचे आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी दरवर्षी अंदाज पत्रकात पाच कोटी रुपये निधी मिळत आहे. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दोन ते अडीच कोटी रुपये निधी मिळतो. सांगडे यांनी सुचवलेल्या कामाप्रमाणे स्थायी समितीने अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली आहे.

परंतु सांगडे यांनी स्थायी समितीकडे तीन वेगवेगळे प्रस्ताव देत त्यांच्या प्रभागातील कामांसाठी असलेला १ कोटी २० लाख रुपये निधी प्रभाग क्र. ३८ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या प्रभागातील विकास कामांसाठी वर्ग केला आहे. तर एक कोटींचा निधी प्रभाग क्र. ३७ क, अप्पर इंदिरानगर मधील शिवसेनेच्या नगरसेवकाने सुचवलेल्या कामांना वर्ग केला आहे. स्थायी समितीनेही त्याला मंजुरी दिली असून हा वर्गीकरणाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

परंतु या वर्गीकरणाची खमंग चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. कळस – धानोरीतील सर्व विकास कामे झाली आहेत, त्यामुळे संबंधित नगरसेवकाला निधीची गरज नाही. धानोरी चा निधी थेट कात्रज, अप्पर इंदिरानगरला आणि तेही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना देण्यामागे नेमका ‘उद्देश’ काय ? अशी उलट सुलट खमंग चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

Visit : Policenama.com