‘3 कारभारी अन् रोज बदला अधिकारी, तिघाडी सरकारचा कारभार लय भारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या अनागोंदी वरून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. भाजप नेते आणि आमदार आशीष शेलार यांनी एक कविता ट्विट केली असून या कवितेतून त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ट्विट केलेल्या कवितेमध्ये शेलार म्हणतात, राज्यात शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तर शिक्षणक्षेत्रातील अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधांतरी लटकले आहे. राज्यातील सरकारच्या आधी घोषणा, मग निर्णय आणि नंतर अभ्यास असा कारभार सुरु आहे.

परीक्षांबाबत राज्यात असलेल्या 11 विद्यापीठांचं एकसूत्र कसं ठरेल हा मोठा पेच आहे. तसेच राज्यातील अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारकडून वारंवार होत असलेल्या बदल्यांवर टीका करताना आशीष शेलार म्हणतात, राज्यात तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी असा लय भारी करभार सुरु आहे, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. दरम्यान, येऊ घातलेल्या गणेशोत्सवावरून आशीष शेलार यांनी सरकारवर प्रश्नांची सरब्ती केली होती.

राज्यात कोरोनाच वाढत संकट लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा यासाठी शासनाने भूमिका घेतली तर मुर्तींची उंची व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतचे नियम अद्याप स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. तयारीला लागणारा वेळ पहाता विलंब न करता शासनाने वेळीच नियमावली जाहीर करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.