‘एकनाथ खडसे जाणार कुठे…,’ नाथाभाऊंच्या नाराजीवर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरील चर्चा अजूनही सुरु आहे. शरद पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत हिरवा कंदील दिला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे, ते म्हणाले कि एकनाथ खडसेंची नाराजी संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे ते पुन्हा एकदा उत्साहाने सहभाग नोंदवतील असा विश्वास त्यांच्यकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले
“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपाचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत. त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नाराज होणं, पुन्हा सामान्य होणं ही एक प्रक्रिया असते. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत दिली. खडसे नाराज असल्याने कार्यक्रमांना अनुपस्थित असतात असे जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले प्रदेश कार्यकारिणीला ते दिवसभर उपस्थित होते. संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच गेले.

खडसे यांना राष्ट्रवादीचा हिरवा कंदील
“विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून एकनाथ खडसे नाव खूप मोठे आहे. एक पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे जर कोणाला वाटत असेल तर तो माणूस एका विचाराकडे वळतो. जेथे त्याची नोंद घेतली जाते तिकडे जावे का असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच आहे,” असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाथाभाऊंच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे.