देवेंद्र फडणवीस HM अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एक दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आज ते काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेठी घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेणार आहेत. ते राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शाह यांना सांगणार आहेत. तसेच या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील दिल्लीत पोहचले आहेत. या नेत्यांसह साखर प्रश्नाच्या मुद्यावर फडणवीस केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असं असलं तरी फडणवीस यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने इतर मुद्यांचीही चर्चा होत आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार अस्थिर आहे आणि माहाराष्ट्रातही भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. असाच आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

फडणवीसांची नियुक्ती होणार ?

देवेंद्र फडणवी यांनी नुकताच राज्यातील कोरोनाग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्याबद्दलची चर्चाही या दौऱ्यात केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतेच पक्षाचे नेते आशिष शेलार यांनीही दोन दिवसीय दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली होती. तसेच इतर काही नेत्यांची भेट त्यांनी घेतली होती. याशिवाय फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाल्याने, तसेच सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंतकुमार यांचे निधन झाल्यामुळे पक्षाच्या संसदीय समितीत चार जागा रिक्त आहेत. यात एका जागी फडणवीस यांची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस याचा हा दिल्ली दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात असून या दौऱ्यात नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.