Video : ‘मला जे आश्वासन दिलं…’, पक्षांतराची चर्चा असतानाच मेधा कुलकर्णींनी शेअर केला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Vishram Kulkarni) पक्षांतर या करणार असल्याच्या चर्चा आहेत. मेधा कुरकर्णी भाजप सोडणार असल्याचं बोललं जात होतं. कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ शेअर करत यावर भाष्य केलं आहे. या बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मला पक्षानं जे विधान परिषदेचं आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कुलकर्णी यांनी फेसबुकवरून यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी ?

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “मी कुठेही जात नाही. भाजपमध्येच आहे. यापूर्वीही मी कधी कोणत्याही राजकीय नेत्यांच्या संपर्कात नव्हते. आजही नाही. मागच्या वर्षी जेव्हा मला विविध पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या, त्यावेळीही मी नम्रपणे नकार दिला होता. पक्षांतर्गत काही प्रश्न नक्कीच आहेत. परंतु हे प्रश्न पक्षीय पातळीवर सोडवले जातील अशी आशा आहे. त्यामुळं त्याबद्दल जाहीर वाच्यता करण्याची गरज वाटत नाही.”

पुढं बोलताना त्या म्हणाल्या, “चंद्रकांत पाटील यांनी मला विधान परिषदेचं आश्वासन देताना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. त्यांनी काही व्यक्तींना आश्वासन आणि शब्द दिला आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशीच इच्छा असल्यानं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मला पक्षानं विधान परिषदेचं जे आश्वासन दिलं आहे ते नक्की पाळलं जाईल अशा विश्वास आहे.” अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.