भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे नेते पुन्हा पक्षात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी म्हटले होते. नवाब मलिक यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असतानाच पडद्यामगे भेटीगाठी आणि चर्चा सुरु असल्याचे बोललं जात आहे. एकीकडे या चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार आशिष शेलार थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार हे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आज शेलार यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करत असतानाचा फोटो सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे. आशिष शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील मात्र समजू शकला नाही. मात्र, या भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे पहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते मलिक ?
मलिक यांनी ट्विट करून म्हटले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा परतण्यास उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हा निर्णय सार्वजनिक जाहीर केला जाईल, असेही मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काही आमदार शरद पवार, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.