…मग उद्धवजी पण गारद का ? मुलाखतीवरून नितेश राणेंची राऊतांवर टीका

पोलिसनामा ऑनलाईन – संजय राउत यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीची चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात चांगलीच सुरू आहे. ही मुलाखत सामना स्टाईल असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्याचा प्रोमही त्यांनी ट्विट केलाय. त्यावर टॅगलाईन देताना ‘एक शरद, सगळे गारद’ असे म्हटले आहे.त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

एक शरद, सगळे गारद तर मग उद्धवजीही गारद झालेत का? असा सवाल आमदार राणे यांनी राऊतांना केला आहे. तुम्ही आपल्याच मालकाला असे म्हणता वाह! वाह! क्या बात है अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.या मुलाखतीच्या पहिल्या भागात कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिर पर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. येत्या शनिवारी या मुलाखतीचा पहिला भाग सामना वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी आत्तापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरे चांगलीच गाजली होती. आता त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राऊतांनी शरद पवारांना अनेक गुगली प्रश्न विचारले. मात्र, त्या सर्व प्रश्नांवर पवारांनी षटकार ठोकत खास आपल्या शैलीत उत्तरे दिली आहेत.