‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है’, भाजप आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   केंद्र सरकारनं वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी तीन नवीन विधेयकं मांडली. यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु या कृषी विधेयकावरून केंद्र सराकर विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे. विरोधी पक्षांनी ही विधेयकं शेतकरीविरोधी असल्याची जोरदार टीका केली आहे. पंजाब आणि हरियाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे.

राज्यसभेत कृषी विधेयकं सादर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत चर्चेसाठी अनुपस्थित होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवरून आता विरोधकांकडून टीका होत आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही शरद पवार त्यांच्यासोबत आहेत असा दावा केला आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची माहिती देण्यासाठी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकरी सुरक्षित आहेत. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे परंतु त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला.” असंही राणेंनी सांगितलं.

पुढे बोलताना नितेश राणे यांनी ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है असं संभ्रमात टाकणारं विधान केलं आहे. यानंतर आता सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे.