गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता ‘या’ भाजप आमदाराची शरद पवारांवर खरमरीत टीका, पुन्हा राजकारण तापलं

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळ माजला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता आणखी एका भाजपच्या आमदाराने शरद पवार यांच्यावर निशाणा साधत खरमरीत टीका केली आहे.

भाजपचे आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी शरद पवार यांच्या पक्षाला राज्यात एकहाती बहुमत घेऊन सत्ता स्थापन करता आली नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. त्यांची टीका पाहून ते राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष असले तरी इतर पक्षाचे प्रवक्ते वाटत आहेत, अशी टीका ठाकूर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

सुजितसिंह ठाकूर यांनी टीका करताना शरद पवार यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर तोफ डागली आहे. आता सुरजिसिंह यांच्या टीकेला भूम परांडाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार व गोदावरी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राहुल मोटे यांनी प्रत्युत्तर दिले असून, सुजितसिंह यांची शरद पवार यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. कोणीही पवार यांच्यावर टीका केली की त्यांना मोठेपणा वाटतो, या भावनेतूनच ठाकूर यांनी टीका केली असल्याचा पलटवार मोटे यांनी केला आहे.

तसेच सुजितसिंह ठाकूर यांनी अगोदर जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देखील राहुल मोटे यांनी दिले आहे. मोटे यांच्या प्रत्युरानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चांगली जुंपली असून येत्या आगामी काळात स्थानिक राजकारणावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like