नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत एन्ट्री करताच चंद्रकांत पाटलांची टीका, दोघांमध्ये चांगलीच जुंपली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadnavis) माझा छळ केला, माझ्यासोबत अन्याय झाला (Chandrakant Patil Vs Eknath Shinde) म्हणून मी भाजप पक्ष सोडला, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. खडसे यांनी फडणवीस यांना टार्गेट करु नये, असेही ते म्हणाले. तसेच खडसेंसोबत 10 ते 15 आमदार जाणार होते. मात्र, आज फक्त त्यांचे कुटुंबीय दिसले आणि भविष्य कुणी पाहिलं, असं म्हणत त्यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाषणादरम्यान खडसेंनी फडणवीस आणि भाजपवर टीका केली. त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं ते म्हणाले. यावर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांनी ईडी लावण्याची वाट कशाला बघावी, आधी सीडी पब्लिश करा, असे थेट आवाहन त्यांनी खडसेंना दिलं. खूप दिवसांपासून म्हणत आहेत माझ्याकडे खूप काही आहे. खडसे आता विरोधी पक्षात गेले आहेत. त्यामुळे त्यांनी काही बोलावं आणि आम्ही ते ऐकून घ्यावं अस आता होणार नाही, त्यांनी शब्द जपून वापरावेत अशी ताकीदही त्यांनी दिली आहे. शिवाय, “खडसेंना त्यांची ताकद दाखवायला कुणी अडवलं आहे, असंही ते म्हणाले.

भाजपने खडसेंना सर्व दिलं : पाटील

राष्ट्रवादीत खडसेंनी प्रवेश केला खरा, मात्र अद्याप त्यांना कुठलं पद दिलं जाणार आहे, पक्षात त्यांचं स्थान काय असणार आहे याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. यावरुन चंद्रकांत पाटलांनी खडसेंवर घणाघाती टीका केली. खडसे यांना जर तिकडे काही मिळणार नव्हतं, तर मग चाळीस वर्षांसोबत असलेल्या पार्टीला का सोडले. भाजपने तरी त्यांना सर्व काही दिले, असे ते म्हणाले. तसेच फडणवीसांनी मला छळलं, फडणवीसांमुळे मी भाजप सोडली, असं खडसेंनी वारंवार बोलून दाखवले आहे. त्यांनी फडणवीसांना टार्गेट करू नये, असे ते म्हणाले.

योग्य वेळी सीडी, ईडी बाहेर येईल – एकनाथ खडसे

चंद्रकांत पाटलांच्या टीकेनंतर खडसेंनीही त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील भाजपाचे नाहीत ते विधार्थी परिषदेत असल्याचे ते म्हणाले. इतकंच नाही तर योग्य वेळी सीडी, ईडी बाहेर येईल, असंही ते म्हणाले
भाजपने खडसेंना सर्व दिलं, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी माझं 40 वर्षाचं आयुष्य भाजपला दिलं आहे. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध तरी काय होता तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला आहात. तुम्हाला सर्व फुकट मिळालं आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याशिवाय, कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का?”, असा सवालही त्यांनी केला.

पुराव्याशिवाय कोणतेही आरोप केले नाही : खडसे

भाजपमध्ये माझा छळ झाला. माझी बदनामी झाली. म्हणून मी पक्ष सोडला. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असेही त्यांनी सांगितले. माझा भूखंडाशी काहीही संबंध नसताना माझी चौकशी केली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराचे कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी करणार आहे. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पुराव्याशिवाय मी कोणतेही आरोप केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.