भाजपला पूर्व हवेली तालुक्यात मोठे भगदाड

वाघोली :- पोलीसनामा ऑनलाईन (कल्याण साबळे पाटील) – पूर्व हवेली तालुक्यात भाजपला मोठे भगदाड पाडत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला.भारतीय जनता पार्टीचे नेते,माजी जिल्हा परिषद सदस्य, रामदास दाभाडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष गारटकर व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हातावर घड्याळ बांधले आहे.रामदास दाभाडे यांनी पुणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व पक्ष जी जबाबदारी माझ्यावर टाकेल,ती मी प्रामाणिकपणे निभावेल. भाजपमध्ये असताना आम्हाला कधीही विश्वासात घेतले जात नव्हते,तसेच वाघोलीच्या विकासावर माझा नेहमीच भर असेल,तर अशोक पवार यांच्या सारख्या दूरदुष्टी व विकास वृत्ती असलेला आमदार मतदार संघाला लाभला आहे.

त्यांनी वाघोली विकासावर अधिक लक्ष दिले आहे .राष्ट्रवादीत योग्य सन्मान आहे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करीत आहे, अशा शब्दांत रामभाऊ दाभाडे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यात सरळ लढत झाली होती.त्यावेळेस रामदास दाभाडे यांनी वाघोलीतून तब्बल चार ते पाच हजार मतांची आघाडी भारतीय जनता पक्षाचे बाबुराव पाचर्णे यांना मिळवून दिली होती.त्यात भाजपचे बाबुराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांचा निसटता पराभूत केला होते.परंतु २०१९ च्या निवडणूकीत भाजपला मोठी आघाडी देण्यात त्यांना अपयश आले होते.

दाभाडे यांना वाघोलीत मानणारा मोठा वर्ग आहे, त्यांना वाघोलीच्या राजकारणात म्हत्वाचे स्थान आहे. मात्र सध्या भाजपवर त्यांची नाराजी होती,की स्थानिक पातळीवर पक्षात काही कुरघोड्या सुरू होत्या का ? . यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला की अन्य काही कारण हे माञ गुलदस्तात आहे. मात्र त्यांच्या पाठीमागे असलेल्या कार्यकर्त्याचे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे. त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने वाघोली राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढली असून. आमदार अशोक पवार यांची वाघोली जिल्हापरिषद गटावर मजबूत पकड निर्माण झाली आहे.यावेळी आमदार अशोक पवार,पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर,माजी सरपंच शिवदास उबाळे उपस्थित होते.