अनुपम खेर यांचा मोदींच्या विरोधकांवर निशाणा, म्हणाले – ‘इस थप्पड की गूंज सबको सुनाई देगी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पीएम केअर फंडकडून 3 हजार 100 कोटींचे वाटप करण्यात आले असून यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी 1 हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे. यावरून बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनी पीएम केअर फंडवर टीका करणार्‍यांवर हल्लाबोल केला आहे. ही तर त्या दु:खी आत्म्यांच्या चेहर्‍यावर मारलेली चपराक आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

अनुपम खेर यांनी ट्विटला रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना पीएम फंडमध्ये कोणत्या प्रकारचे षडयंत्रा आहे असे वाटत होते त्या सर्व दु:खी आत्म्यांच्या चेहर्‍यावर लगावण्यात आलेली ही जोरदार चपराक आहे. आता याचा आवाज सर्वांना ऐकू येईल आणि नक्कीच ऐकू येईल, असे म्हणत त्यांनी टीका करणार्‍यांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3 हजार 100 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.

यामधील 2 हजार कोटी रुपये व्हेटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. तर 1 हजार कोटी रुपये स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित 100 कोटी रुपये लसनिर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी पीएम फंडची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.