काँग्रेसच्या रोड शोमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी जखमी

जयपूर : वृत्तसंस्था – नेत्यांच्या प्रचारासाठी अनेकदा चित्रपट आणि मालिकांमधल्या सेलिब्रेटींना प्रचारासाठी बोलावले जाते मात्र अशाच एका प्रचारासाठी जाणे अभिनेत्री महिमा चौधरीला चांगलेच महागात पडले आहे. जयपूर येथील प्रचार रॅलीदरम्यान ती जखमी झाल्याची माहिती आहे.

अन् अचानक तुटले लाकडी व्यासपीठ…
राजस्थानातील हमुमानगड जिल्ह्यातील भारदा येथे काँग्रेस उमेदवार रफिक मंडेलिया यांच्या प्रचारार्थ रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो करिता एका पिकअप जीप वर अभिनेत्री महिमा चौधरीसह उमेदवार रफिक मंडेलीया आणि इतरांना उभे राहण्यासाठी बनवलेले लाकडी व्यासपीठ अचानक मोडले. त्यामुळे सर्वजण खाली पडले. या घटनेत अभिनेत्री महिमा चौधरीच्या पायाला दुखापत होऊन ती जखमी झाली आहे.
महिमा चौधरी

अर्धवटच सोडावी लागली प्रचार रॅली
ऐन रॅली सुरु असताना अचानक लाकडी व्यासपीठ मोडले आणि प्रचारात गोंधळ निर्माण झाला. अपघात घडल्यानंतर मात्र  महिमाला काँग्रेस उमेदवार रफिक यांची रॅली अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. यावेळी महिमासह काहीजण जखमी झाल्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.

अभिनेत्री महिमा चौधरी विषयी …
१९९७ च्या ‘परदेस’ चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्रीला महिमा चैधरी हिने थोडेच चित्रपट केले मात्र या चित्रपटातून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. धडकन, ओम जय जगदीश , बागबान, मुंबई गँगस्टर या चित्रपटांत ती झळकली. २०१६ मध्ये आलेल्या डार्क चॉकलेट चित्रपटानंतर बॉलिवूड पासून ती सध्या लांबच आहे.