गांजा बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – गांजा बाळगणाऱ्या दोघांना पिंपरी चिचंवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून १ लाख ११ हजार २६० रुपये किंमतीचा ५ किलो ५९५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई बाणेर येथील मोहननगरमध्ये करण्यात आली.

पोपट प्रभाकर चोरघे (वय-४९ रा. हायक्लास रेसिडेन्सी, बावधन, पुणे), जाफर अफजल पठाण (वय-२३ रा. जिजाऊ चौक, म्हाळुंगे) यांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक संतोष दिघे यांना दोन व्यक्तींकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बाणेर येथील मोहनगरमधील कुमार प्रॉपर्टी मैदानाजवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा आढळून आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजेंद्र बांबळे, राजन महाडीक, रमेश भिसे, पोलीस नाईक संतोष दिघे, दिनकर भुजबळ, पोलीस शिपाई शैलेश मगर, दादा धस, संतोष भालेराव, प्रसाद जंगीलवाड, प्रदिप गुट्टे यांच्या पथकाने केली.