ब्रेकिंग – ST बस – रिक्षा विहिरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

नाशिक/देवळा : पोलीसनामा ऑनलाइन – बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु आहे.

मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात असताना या बसला अपघात झाला. कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. बसचे टायर फुटल्याने बसने रिक्षाला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातानंतर बस रिक्षासह विहिरीत कोसळली.

धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेल जवळ हा भीषण अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बसमध्ये किती प्रवासी होते याबद्दल अधिक तपशील मिळू शकला नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढल जात आहे. एसटी बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना मालेगाव देवळा तर काहींना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.