‘५६ इंचाच्या छातीचा अभिमान बाळगणाऱ्यांना ५५ तासही कर्नाटक सांभाळता आलं नाही- प्रकाश राज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्नाटकातील भाजपचं सरकार अवघ्या दोन दिवसांत कोसळल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. यामध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज देखील मागे नाहीत. मागील काही दिवसापूर्वी प्रकाश राज यांनी मोदी सरकारच्या कारभारा विरोधात आवाज उठवला होता, त्यावेळी प्रकाश राज चांगलेच प्रकाशझोतात आले होते. राज यांनी कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलाच टोला लगावला आहे. ‘५६ इंचाच्या छातीचा अभिमान बाळगणाऱ्या मोदींना ५५ तासही कर्नाटक सांभाळता आलं नाही,’ अशी बोचरी टीका राज यांनी मोदी सरकारवर केली आहे.

सुरूवातीपासूनच कर्नाटकची निवडणूक अनेक कारणांनी गाजली होती. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. आपण बहुमताचा आकडा गाठू या दाव्याने भाजपने कर्नाटकात सत्ता देखील स्थापन केली होती. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना काल बहुमत सिद्ध करता आलं नाही त्यामुळे येडियुरप्पा यांना अवघ्या दोन दिवसातच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला. या घडामोडींचा संदर्भ देत प्रकाश राज यांनी एक ट्विट केलं आहे.

पहा नेमकं काय म्हणाले आहेत प्रकाश राज ट्विटरच्या माध्यमातून
‘कर्नाटकचा रंग भगवा होणार नाही. तो रंगीबेरंगीच राहणार आहे. सामना सुरू होण्याआधीच संपला आहे. छप्पन्नचं काय घेऊन बसलात, ५५ तासही त्यांना कर्नाटक आपल्या ताब्यात ठेवता आलेलं नाही, कर्नाटकातील नागरिकांना आता पुढील गलिच्छ राजकारणासाठी तयार राहावं लागेल, असं सांगतानाच, ‘मी यापुढंही जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहीन आणि प्रश्न विचारत राहीन,’ असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.