सावधान ! पुण्यात रस्त्यावर अथवा सार्वजिक ठिकाणी थुंकल्यास होणार 1 हजारांचा दंड !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेनं आता थुंकी बहाद्दरांविरुद्धची मोहिम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये अद्यापही गांभीर्य दिसत नाही. तंबाखू आणि गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. आता रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकी बहाद्दरांना थेट 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आधी हा दंड 100 रुपये एवढा होता.

सार्वजनिक ठिकणी थुंकणं, अस्वच्छता करणं, घाण करणं अशा कृतीसाठी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु कारवाई होत असूनही नागरिक रस्त्यावर थुंकताना दिसत आहेत. त्यामुळं आता दंडाची रक्कम 1000 एवढी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तसं पत्र पालिकेला पाठवलं आहे. पालिका आयुक्तांकडून याबाबतचे आदेश शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.

याशिवाय जे लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणार नाहीत त्यांना 100 रुपयांचा दंड आकारला जात होता. यापुढं आता 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांना दंड आकारणीचे व पुढील कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.