मतदान कार्डला (Voter ID) ‘आधार’कार्डशी (Aadhaar) जोडण्याचा मार्ग मोकळा, सरकारनं निवडणुक आयोगाला दिलं ‘ग्रीन’ सिग्नल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मतदान ओळखपत्राला आधार कार्ड जोडण्याचा मार्ग साफ झाला आहे. कारण निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने सहमती दिली आहे. यासाठी निवडणूक आयोगाला कायदेशीर सक्ती मिळेल. मतदान कार्ड आधार कार्डला लिंक केल्याने खोट्या मतदानाला आळा घालता येईल. तसेच स्थलांतरित मतदारांना रिमोट वोटिंगचा अधिकार देण्यास सहयोग मिळेल. पेड न्यूज आणि उमेदवारी अर्जातील चूकांसंबंधित निवडणूक सुधारणांसारख्या मुद्यांवर आयोगाने कायदा मंत्रालयासोबत बैठक घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्या बैठकीत मतदान कार्ड आधार कार्डला जोडण्यासंबंधित चर्चा झाली.

पेड न्यूज – चूकीच्या माहिती देण्याला गुन्हा ठरवण्याची मागणी –
निवडणूक आयोगाने मंगळवारी बैठकीत पेड न्यूज आणि निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरताना चूकीची माहिती देणे हे प्रकार गुन्हा ठरवण्यात यावे असा प्रस्ताव मांडला आहे. आता कायदा मंत्रालय निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची तयारी करत आहे. आयोगाने कायदा मंत्रालयाला जनप्रतिनिधी कायद्यात संशोधनाचा प्रस्ताव दिला होता. यात मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याची मागणी होती. कायदा मंत्रालयाने मंजूरी देत सर्व स्तरावर माहिती सुरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला पाठवला प्रस्ताव –
निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला ऑगस्ट 2019 मध्ये मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्याचा प्रस्ताव पाठवला होता जो कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वीकारला होता. निवडणूक आयोगाने सांगितले होते की 12 आकडी क्रमांक असलेला आधार क्रमांक मतदान कार्डला लिंक करण्यासाठी त्यांना कायदेशीर अधिकार हवा आहे.

जुन्या, नव्या सर्व मतदारांना द्यावा लागणार आपला आधार क्रमांक –
निवडणूक आयोग म्हणाले होते की, बनावट मतदारांवर लगाम लावण्यासाठी जुन्या आणि नव्या मतदारांना आपला आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. परंतु असे जर कोणी केले नाही तरी त्याचे नाव मतदार यादीतून हटवण्यात येणार नाही. तसेच त्यांना मतदार यादीत आपले नाव सहभागी करण्यास कोणी रोखू शकणार नाही.