भाजपमध्ये १ नंबरचे असतात, २ नंबरचे कोणी नाही : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक नंबरचे नेते आहेत. दोन नंबरचे कोणीही नाही, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आरोपाला दिले.

लोणी येथे गुरुवारी कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांनी आपला भाजप प्रवेश नंबर दोनच्या नेत्यामुळे रखडल्याचे नुकतेच विधान केले होते. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हेच एक नंबरचे आहेत. त्यामुळे दोन नंबरचा प्रश्नच नाही. त्यामुळे नारायण राणे यांचा आरोप गांभीर्यानेे घेण्यासारखा नाही.

निकालापर्यंत चिंताच
राज्यात महायुतीला ४४ जागा मिळतील, असे अंदाज सर्व टिव्ही चॅनल्स वर्तवित आहेत. तरीही निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत सर्वांना चिंता असतेच. तशी आम्हालाही आहे, असेही पाटील म्हणाले.

विखे यांच्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांना महसूल किंवा गृहखाते मिळेल, असे अंदाज वर्तविले जात आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी ‘सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. गेल्या पाच वर्षात ते किती सक्षम आहेत हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे विखे यांच्याबाबत तेच निर्णय घेतील.’